गुजरातच्या बड्या नेत्यांसोबत PM मोदींची बैठक; आपनं विचारलं, "भीतीमुळे निवडणुकीची लवकर तयारी...?"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 05:47 AM2022-05-01T05:47:49+5:302022-05-01T05:48:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री, कायदामंत्री आणि मुख्य सचिवदेखील उपस्थित होते.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीला (Gujarat Assembly Election) आठ महिन्यांचा कालावधी उरला असतानाही भाजपने त्यासाठीची आता जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर राज्य नेत्यांची सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी आणि मुख्य सचिव कैलाशनाथन उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत भाजपकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचवेळी आम आदमी पक्षाने या बैठकीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
गुजरातमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पुढील आठवड्यात विधानसभा बरखास्त करणार का?, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी भाजपला केला आहे. "भाजप पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा बरखास्त करणार का?, 'आप'ची इतकी भीती?," असा सवाल करत केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
क्या भाजपा अगले हफ़्ते गुजरात विधान सभा भंग करके गुजरात के चुनावों का एलान करने जा रही है? “आप” का इतना डर?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 30, 2022
वर्षअखेरिस निवडणुका
या वर्षाच्या अखेरिस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये विजय मिळवणारा आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेतही नशीब आजमवण्याच्या तयारीत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गुजरातमध्ये रोड शो केले होते. मला राजकारण करता येत नाही, भ्रष्टाचार संपवता येतो. पंजाबमध्ये भगवंत मान यांनी भ्रष्टाचार संपवला आहे, आता गुजरातची वेळ, असं यादरम्यान केजरीवाल म्हणाले होते.