गुजरात विधानसभेच्या निवडणुकीला (Gujarat Assembly Election) आठ महिन्यांचा कालावधी उरला असतानाही भाजपने त्यासाठीची आता जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर राज्य नेत्यांची सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी आणि मुख्य सचिव कैलाशनाथन उपस्थित होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत भाजपकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचवेळी आम आदमी पक्षाने या बैठकीवरून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
गुजरातमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यासाठी पुढील आठवड्यात विधानसभा बरखास्त करणार का?, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी भाजपला केला आहे. "भाजप पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा बरखास्त करणार का?, 'आप'ची इतकी भीती?," असा सवाल करत केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार निशाणा साधला.