कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज नेमकी कोणतीह घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नरेंद्र मोदी आजच्या संबोधनामध्ये देशातील नागरिकांना अनलॉकबाबत माहिती देऊन अनलॉक होत असलं तरी निष्काळजीपणा बाळगून चालणार नाही याची जाणीव करुन देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. अनेक राज्यांनी निर्बंध देखील शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. यात दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्येही अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज देशातील नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. याआधीच्या लॉकडाऊननंतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे यावेळी नागरिकांना अनलॉक संदर्भात जनजागृती करण्याचा मोदींचा मानस असू शकतो.
देशव्यापी कोरोना लसीकरण मोहीम?काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून याआधीही देशात सर्वांचं मोफत कोरोना लसीकरण करावं अशी मागणी लावून धरली आहे. केंद्र सरकारकडून सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचं सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण केलं जात आहे. पण १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राज्य सरकारांना लस विकत घ्याव्या लागत आहेत. सध्या काही राज्यांकडूनही राज्य सरकारी पातळीवर मोफत कोरोना लसीकरण सुरू आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी केंद्र पातळीवरच देशातील सर्वांचंच मोफत लसीकरण केलं जावं अशी मागणी सातत्यानं होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेची घोषणा करण्याची शक्यता आहे.
आर्थिक पॅकेजची घोषणा?कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात उद्योगधंदे आणि आर्थिक गाडा ठप्प झाला आहे. मोठ्या कंपन्या असोत किंवा मग मोलमजुरी करणारा कामगार सर्वांनाचा लॉकडाऊनचे चटके सहन करावे लागले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था देखील कोसळली आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेतून देशाला सावरण्यासाठी मोदी आज आणखी एका पॅकेजची घोषणा करू शकतात.