Coronavirus: येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू'; पंतप्रधान मोदींची जनतेला साद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 08:30 PM2020-03-19T20:30:46+5:302020-03-19T20:41:18+5:30
Coronavirus: पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद; येत्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचं सुरू असलेलं थैमान, देशात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी आज संवाद साधला. येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू' करण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजता जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं मोदींनी म्हटलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत, याची तपासणी 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून करूया, अशी साद त्यांनी घातली.
PM Modi: On 22nd March, from 7 am to 9pm, all countrymen have to follow 'Janta Curfew' #CoronaViruspic.twitter.com/dXRmvlDHM3
— ANI (@ANI) March 19, 2020
युद्धाच्या परिस्थितीत ब्लॅकआऊट केलं जायचं. शत्रू राष्ट्रांना शहरं, गावं दिसू नये म्हणून घरातल्या लाईट्स बंद केल्या जायच्या. काचांना काळे पडदे लावले जायचे. युद्ध संपल्यानंतरही काही महापालिकांनी ब्लॅकआऊटचं मॉकड्रिल सुरू ठेवलं, याचा संदर्भ देत मोदींनी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळण्यात यावा, अशी साद घातली. २२ मार्चला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. देशाच्या हितासाठी लोकांनी घरी राहावं. राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचं नेतृत्व करावं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Prime Minister Narendra Modi: If possible, please call at least 10 people every day and tell them about the 'Janta Curfew' as well as the measures to prevent #coronavirus. https://t.co/CU3DoSOVub
— ANI (@ANI) March 19, 2020
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करणं आवश्यक आणि उपयोगी असून त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी करता येईल, असं मोदी म्हणाले. मला काहीच होणार नाही अशा भ्रमात राहणं योग्य होणार नाही. त्यामुळे पुढील काही आठवडे अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडा. शक्य तितकी कामं घरातूनच करा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.