वाॅशिंग्टन : ‘क्वाड’ बैठकीच्या निमित्ताने अमेरिकेच्या दाैऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासाेबतही चर्चा केली. या भेटीदरम्यान माेदींनी हॅरिस यांना खास भेटवस्तू दिल्या आहेत. याशिवाय इतर नेत्यांनाही माेदींनी भेटवस्तू दिल्या. त्यांची चर्चा सुरू आहे. कमला हॅरिस यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये एक वस्तू त्यांच्या आजाेबांशी संबंधित आहे. ही भेटवस्तू पाहून हॅरिस अतिशय आनंदी झाल्या. त्यांचे आजाेबा पी. व्ही. गाेपालन हे वरिष्ठ सरकारी अधिकारी हाेते. त्यांच्याशी संबंधित काही माहिती, अध्यादेश इत्यादींच्या प्रती एका हस्तशिल्प फ्रेममध्ये सजवून ही फ्रेम त्यांना भेट म्हणून देण्यात आली. तर पंतप्रधान माेदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथील हस्तकलेच्या एका उत्कृष्ट नमुन्याची खास भेट देण्यात आली. गुलाबी मीनाकारी असलेला बुद्धिबळाचा संच हॅरिस यांना भेट दिला.
मॉरिसन यांना भेटपंतप्रधान माेदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्काॅट माॅरिसन यांच्याशीही चर्चा केली. माॅरिसन यांना माेदींनी चांदीची मीनाकारी असलेले एक जहाज भेट दिले. हे जहाजदेखील हातांनी तयार करण्यात आले हाेते. तर जपानचे पंतप्रधान याेशिहिदे सुगा यांनाही माेदींनी चंदनाची एक बुद्ध मूर्ती भेट दिली.