“काँग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात”; PM मोदींचे राज्यसभेतून थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:53 PM2024-02-07T14:53:51+5:302024-02-07T14:55:24+5:30
PM Narendra Modi In Rajya Sabha: इतकी वर्ष देशावर राज्य केलेल्या मोठ्या पक्षाचे अशा प्रकारे पतन झाले, याबाबत आमच्या संवेदना आहेत, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
PM Narendra Modi In Rajya Sabha:संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. पूर्ण संयमाने आणि धैर्याने आम्ही तुमचे म्हणणे शांतपणे ऐकले. मात्र, माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. देशातील जनतेने या आवाजाला ताकद दिली आहे. देशातील जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळे हा आवाज बुलंद होत आहे. संसदेत तुम्ही आले आहात, मला वाटले की सर्व मर्यादांचे पालन कराल. मात्र, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्यात. मीही तयारीनिशी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात
मी केवळ प्रार्थना करू शकतो. पश्चिम बंगालमधून आव्हान देण्यात आले आहे की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस ४० जागाही जिंकू शकणार नाही. मात्र, मी प्रार्थना करतो की काँग्रेसने आपल्या ४० जागा तरी वाचवाव्यात, असा उपरोधिक टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. ज्या गोष्टी देशात घडत आहेत, ते जनतेला समजले पाहिजे. काँग्रेस पक्ष विचारांनीही कालबाह्य झालेला आहे. त्यामुळे कामकाजही आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. इतकी दशके देशावर राज्य करणारा पक्ष, एवढा मोठा पक्ष, याचे अशा प्रकारे पतन झाले आहे. याचा आम्हाला कदापि आनंद नाही. काँग्रेस पक्षासोबत आमच्या संवेदना आहेत, अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने आता ऐकण्याची क्षमताही गमावली आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे एका रात्रीत बरखास्त केली. काँग्रेसने देशाला तोडण्याचे काम केले. देशाला तोडण्याची विधाने सातत्याने काँग्रेसकडून केली जातात. हीच काँग्रेस आम्हाला लोकशाहीवर प्रवचन देत आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसने केलेल्या टीकेवर पलटवार केला.