PM Narendra Modi In Rajya Sabha: सबका साथ, सबका विकास हा केवळ नारा नाही, तर मोदींची गॅरंटी आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली.
मूलभूत प्रश्नांवर, समस्यांवर मार्ग काढून त्याचे निराकरण करणे हाच आमचा उद्देश आहे, प्रयत्न आहे. मात्र, हे करत असताना थोडा वेळ लागेल. यातूनच मजबूत पाया रचला जाईल. तुमच्याकडे माहिती नसेल, तर आमच्याकडे मागा. तुम्हाला ती दिली जाईल. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही नरेटिव्ह सेट करू नका, जेणेकरून तुमची प्रतिष्ठा मलिन होईल आणि तुमच्या शब्दांत कोणतीही किंमत राहणार नाही. कधीकधी तुमच्यावर खूप दया येते, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच सबका साथ, सबका विकास हा केवळ एक नारा नसून, ही मोदींची गॅरंटी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी की गॅरंटी का दौर हैं...
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला कोणीतरी एक कविता पाठवली. ती कविता खूप मोठी आहे. मात्र, त्यातील काही ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. “मोदी की गॅरंटी का दौर हैं... नये भारत की भोर... आऊट ऑफ वॉरंटी चल रहीं दुकाने... खोजें अपनी ठोर...”. देशात निराशात्मक वातावरण पसरवण्याचे काम केले जात आहे. निराशेच्या गर्तेत पूर्णपणे अडकलेल्या लोकांचे आणखी निराशा पसरवण्याचे सामर्थ्य शिल्लक राहिलेले नाही. सत्य परिस्थिती नाकारून हे केले जात आहे. असे करणारे स्वतःचे भले कधीच करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, या लोकांची मर्यादा एवढी असूनही यांनी आपल्या युवराजांना एक स्टार्ट अप तयार करून दिले आहे. पण ते नॉन-स्टार्टर आहेत. ना ते वरती येत आहेत, ना लाँच होत आहेत, असा खोचक टोला पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता लगावला.