नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. मै भी चौकीदार या भाजपाच्या अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ‘चोकीदार चोर है’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून काँग्रेस तसेच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है ही मोहीम आखली. काँग्रेसच्या या मोहीमेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने मै भी चौकीदार ही मोहीम उघडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून ‘मैं भी चोकीदार‘ असे नाव ठेवले त्यानंतर भाजपा मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मै भी चौकीदार अभियान सुरु केले. भाजपाच्या सगळ्या नेत्यांनीच आपल्या नावाच्या पुढे ‘मैं भी चोकीदार’ असा उल्लेख केला. आता या घोषणेला भाजप वेगवेगळ्या देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या टीमसोबत दिल्लीमधील तालकाटोर स्टेडियममध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील ५०० हून अधिक जागांशी एकाचवेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील अशी माहिती भाजपाचे नेते मनोज तिवारी यांनी दिली.
संध्याकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला संबोधित करतील, देशभरातील 1 करोडपेक्षा अधिक लोक पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी जोडले जातील. यामध्ये शेतकऱ्यांपासून, डॉक्टर, वकीलही सहभागी असतील. ‘मैं भी चोकीदार’ या अभिनयाला देशभर पसरवण्यासाठी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरनद्वरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भाजपा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा चांदणी चौकमध्ये तर गृहमंत्री राजनाथ सिंह पूर्व दिल्लीमध्ये असणार आहेत. तसेच भाजपा आमदार, खासदारांनाही कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.