संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकावतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे लाल किल्ल्यावरील त्यांचे अखेरचे भाषण असेल. विशेष म्हणजे, याआधी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर किमान दहा वेळा तिरंगा फडकविला आहे. हा मान मिळविणारे माेदी हे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.
स्वातंत्र्यदिनाचे भाषण हे राजकीय भाषण नसते. तरी पाच राज्यांच्या विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीची झलक पंतप्रधानांच्या भाषणात असू शकते.
मणिपूरच्या घटनांचाही उल्लेख शक्य
सुत्रांनी सांगितले की, ज्या प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत मणिपूरवर भाष्य केले होते तसाच उल्लेख पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात करू शकतात. त्यांच्या भाषणात देशाच्या वाढत्या आर्थिक स्थितीवरही भर दिला जाऊ शकतो. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणे, ही मोठी कामगिरी असल्याचे सांगितले जाईल.
शेतकऱ्यांवरही बोलणार
गत तीन दिवसांपासून पीएमओ हे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि त्यांच्या मंत्रालयाच्या सचिवांच्या संपर्कात आहेत. सुत्रांनी सांगितले की, आपल्या भाषणात पंतप्रधान शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यांच्या भाषणात प्रधानमंत्री सन्मान निधी, पीक विमा योजना, युरियाची उपलब्धता, जागतिक अन्न संकटाचा भारतावर परिणाम नाही, अशा विषयांचा उल्लेख असू शकतो.
ठाण्याचे शेतकरी दाम्पत्य ‘विशेष अतिथी’!
केंद्र सरकारने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ट कामकाज केल्याने राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील दोन शेतकरी लाभार्थी दाम्पत्यांना दिल्ली येथील १५ ऑगस्टच्या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारने आमंत्रित केले आहे. हा विशेष अतिथींचा सन्मान ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधील विजय गोटीराम ठाकरे आणि त्यांच्या पत्नी संगीता ठाकरे या दाम्पत्यास मिळाला आहे.
महिलांना लाभ देणाऱ्या १० मोठ्या योजनांचा उल्लेख भाषणात असू शकते. देशातील ही अर्धी लोकसंख्या मोदी यांची समर्थक असल्याचे मानले जाते. तीन तलाक रद्द केल्यानंतर मुस्लीम महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे.