बुलंदशहर - फटक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना त्यामुळे असणारा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी फटाक्यांची विक्री होत आहे. बुलंदशहरच्या खुर्जामध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या एक दुकानावर पोलिसांना छापा मारला. दुकान विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या विक्रेत्याच्या मुलीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यावर चिमुकलीने त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटल्याची घटना समोर आली आहे. माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत ती मदतीसाठी याचना करत होती. पोलिसांनी चिमुकलीला पाहिलं. मात्र त्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. हे पाहून चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर जोरजोरात डोकं आपटून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या चिमुकलीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ती थांबली नाही.
फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार आणि पोलिसांमध्ये झाला वाद
चिमुकलीचा गाडीवर डोकं आपटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून अनेकांना त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुर्जा कोतवाली नगर क्षेत्रातील एका गावामध्ये फटाक्यांची विक्री केली जात होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते कारवाईसाठी गेले. मात्र त्याचवेळी फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांनी त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं. मात्र हा संपूर्ण प्रकार दुकानदाराच्या मुलीने पाहिला.
ती रडत होती... जोरजोराने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटत होती
वडिलांना पोलीस अशाप्रकारे घेऊन जात असलेलं पाहिल्यावर तिने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटायला सुरुवात केली. पोलिसांनी तिला थांबवलं. मात्र ती मोठमोठ्याने रडत असलेली आणि माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत असलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. पोलिसांनी चिमुकलीच्या वडिलांसह अन्य काही दुकानदारांवर देखील कारवाई केली आहे. फटाक्यांची विक्री करत असल्याने त्यांना ताब्यात घेतलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.