अंत्ययात्रा रोखून पोलीस अधिकारी बनला देवदूत, त्या 'मृत' युवकाचे वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 02:15 PM2017-12-20T14:15:39+5:302017-12-20T14:31:21+5:30

जिवंत माणसाला मृत समजून दिल्लीतील एक कुटुंब अंत्यसंस्कार करायला निघाले होते. पण पोलीस दलातील एका अधिका-याने समयसूचकता आणि प्रसंगावधान दाखवल्यामुळे युवकाचे प्राण वाचले.

Police officer rescues life after death and saved alive 'dead' | अंत्ययात्रा रोखून पोलीस अधिकारी बनला देवदूत, त्या 'मृत' युवकाचे वाचवले प्राण

अंत्ययात्रा रोखून पोलीस अधिकारी बनला देवदूत, त्या 'मृत' युवकाचे वाचवले प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देवीस मिनिटांनी राजूचे वडिल त्याच्या रुममध्ये गेले तेव्हा समोरचे दृश्य बघून त्यांना धक्काच बसला.संजय कुमार निपचित पडलेल्या राजूची शरीराची पाहणी करत होते, तितक्यात शववाहिनी घराबाहेर आली. 

नवी दिल्ली - जिवंत माणसाला मृत समजून दिल्लीतील एक कुटुंब अंत्यसंस्कार करायला निघाले होते. पण दिल्ली पोलीस दलातील एका अधिका-याने समयसूचकता आणि प्रसंगावधान दाखवून त्या कुटुंबाला अंत्यसंस्कार करण्यापासून रोखल्यामुळे 21 वर्षीय युवकाचे प्राण वाचले. सोमवारी संध्याकाळी बारा हिंदू राव भागातून दिल्ली पोलिसांना एका युवकाने आत्महत्या केल्याचा फोन आला. एसएचओ संजय कुमार तात्काळ आपल्या पथकासह  घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. 

संजय कुमार यांनी कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि,  संपूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसलेले असताना राजू (21) आपल्या रुममध्ये निघून गेला. वीस मिनिटांनी राजूचे वडिल त्याच्या रुममध्ये गेले तेव्हा समोरचे दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. राजूने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. त्यांचा हंबरडा ऐकून घरातले सगळे तिथे पोहोचले. राजूने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. घरातल्यांनी त्याच्या गळयाभोवतीचा फास सोडवून त्याला खाली उतरवले. 

खरतर राजू त्यावेळी बेशुद्धावस्थेत होता. पण त्याचा मृत्यू झालाय असा घरच्यांचा समज झाला. त्यांच्यापैकी एकाने पोलिसांना फोन करुन या आत्महत्येची माहिती दिली. संजय कुमार तिथे पोहोचल्यानंतर त्यानी खोलीची पाहणी केली. त्यावेळी उंची कमी असल्यामुळे गळफास घेऊन मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी शोकसागरात बुडालेल्या कुटुंबाने राजूच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. संजय कुमार निपचित पडलेल्या राजूची शरीराची पाहणी करत होते. तितक्यात शववाहिनी घराबाहेर आली. 

संजय कुमार राजूला तपासत असताना त्याच्या नाडीचे ठोके चालू असल्याचे त्यांना जाणवले. या ठोक्यांचा वेग खूप मंद होता. त्यांनी तात्काळ राजूला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांनी गाडीमध्ये राजूला सीपीआर उपचार मिळतील याची व्यवस्था केली. रुग्णालयात डॉक्टरांनी योग्य ते उपचार करुन राजूला शुद्धीत आणले. राजूला रुग्णालयात आणायला आणखी थोडा उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. शुध्दीत आल्यानंतर राजूने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आई-वडिलांकडून सतत ओरडा पडत असल्याने आपण आत्महत्येचा पाऊल उचलले असे त्याने पोलिसांना सांगितले. 

Web Title: Police officer rescues life after death and saved alive 'dead'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.