पणजी: तरुण सरपंचानं दिलेल्या आव्हानामुळे गोव्यातील अनेक आमदार आणि मंत्री सध्या शेतात उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी शेतात उतरावं, असं आव्हान गोव्यातील एका 25 वर्षीय तरुण सरपंचानं दिलं होतं. यामुळे गोव्यातील राजकीय नेते सध्या शेतात उतरुन घाम गाळताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिलं होतं. यानंतर देशभरात फिटनेस चॅलेंजची मोठी चर्चा होती. मात्र आता गोव्यात शेती चॅलेंजची चर्चा आहे.गोव्यातील एक्वेम-बॅक्सो ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश भगत यांनी शेतीच्या समस्यांविषयी राजकारण्यांना जागरुक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. याला त्यांनी 'शेती आव्हान' असं नाव दिलं आहे. या मोहिमेच्या अंतर्गत त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना शेतात उतरण्याचं आव्हान दिलं. त्यामुळे सर्वच नेते सध्या शेतात उतरल्याचं चित्र राज्यभरात दिसत आहे. महसूल मंत्री रोहन खौंते आणि काँग्रेस आमदार ऍलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी भगत यांचं आव्हान पूर्ण केलं आहे. भगत यांचं आव्हान स्वीकारुन सर्वात आधी आमदार ऍलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को शेतात उतरले. याशिवाय कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनीही शेतात जाऊन घाम गाळला. गोव्यातील तरुणांनी यांत्रिक शेतीकडे वळावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केली. 27 जून रोजी सिद्धेश भगत यांनी फेसबुक पोस्ट लिहून राजकारण्यांना शेतात उतरण्याचं आव्हान दिलं होतं. 'शेतकऱ्यांच्या समस्या वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसून समजणार नाहीत. त्या शेतात उतरल्यावरच समजतील,' असं भगत यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
तरुण शेतकऱ्याच्या 'या' चॅलेंजमुळे नेते उतरले शेतात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 3:42 PM