'पॉझिटीव्ह रुग्णांसोबत अनेकदा संपर्क आला, तरीही 5 व्यांदा अहवाल निगेटीव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:33 PM2020-07-17T17:33:26+5:302020-07-17T17:37:38+5:30
कोरोनावर अद्याप लस निघाली नसली तर, कोरोनावर सर्वसाधारण उपचारातून रुग्ण बरे होत आहेत.
बंगळुरू - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशामध्ये गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले असून, इतकी विक्रमी वाढ प्रथमच झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ लाख ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. मात्र, दुसरीकडे लक्षणं नसलेले रुग्णही पॉझिटीव्ह आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होत आहे. तसेच, मी अनेकदा पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येऊनही कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे एका आयपीएस अधिकाऱ्याने म्हटले आहे.
कोरोनावर अद्याप लस निघाली नसली तर, कोरोनावर सर्वसाधारण उपचारातून रुग्ण बरे होत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. गुरुवारी २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झाले आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण ६३.२४ टक्के झाले असून तेदेखील आजवरचे सर्वांत जास्त प्रमाण आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढल्याने काहीही चिंता दूर होत आहे. मात्र, अद्यापही कोरोनाच्या लक्षणांवरुन संभ्रम व गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळत आहेत. एखाद्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर, संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह येत आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही काहींचे अहवाल निगेटीव्ह आल्याचे दिसून येते.
My driver is tested Corona positive, I have home quarantined myself for 4 days and will get myself tested again on Monday for the (5) fifth time since 3 months. I had to be in numerous inadvertent interactions with positive cases. Seek your good wishes, am not yet positive !!
— Bhaskar Rao IPS (@deepolice12) July 17, 2020
बंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांच्या ड्रायव्हरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर, राव यांनी स्वत:ला 4 दिवसांसाठी क्वारंटाईन केले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी आपली कोरोना चाचणीही करुन घेतली. सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला. राव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी अद्याप कोरोनामुक्त असल्याचे त्यांनी म्हटले. विशेष म्हणजे, मी अनेकदा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलो आहे, त्यामुळे गेल्या 3 महिन्यात मी ही पाचवी टेस्ट केली. मात्र, सुदैवाने माझी कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे राव यांनी ट्विटरवरुन सांगितले.
दरम्यान, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तर, आत्तापर्यंत एकूण बळींची संख्या २४, ९१५ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवसात कोरोनाचे ३२,६९५ नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाच्या आजारातून ६,१२,८१४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या ३,३१,१४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.