जुलैमध्ये सुरू होणार पोस्टल बँक; दीड लाख शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:42 AM2018-06-13T05:42:05+5:302018-06-13T05:42:05+5:30
जगातील सर्वांत मोठी बँक जुलै महिन्यात भारतात सुरू होणार आहे. टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीला लागले आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी बँक जुलै महिन्यात भारतात सुरू होणार आहे. टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीला लागले आहे. रिझर्व्ह बँकेकडून १५ दिवसांत टपाल खात्याला बँकिंगची परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.
सध्या त्याच्या रायपूर व रांची या दोनच शहरांत शाखा असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत आणखी ६५0 शाखा सुरू होतील. त्यानंतरच्या दीड वर्षात दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांत एक्सेस पॉइंट वा एक्स्टेंशन शाखा सुरू झालेल्या असतील. केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. ती मिळाल्यानंतर १५ दिवसांत एक डझनाहून अधिक पोस्टल बँक शाखा सुरू होतील. ही अशी बँक असेल की जिच्या १ लाख ३३ हजारांहून अधिक ब्रँच वा एक्सेस पॉइंट ग्रामीण भागांत असतील. सध्या २३ हजार टपाल कार्यालयांत बँकिंगसाठी आवश्यक असणारी सीबीएस म्हणजेच कोअर बँकिंग सिस्टिम आहे.
शिवाय ९९५ एटीएमही बसवण्यात आले आहेत. आम्ही ग्राहकांच्या घरी जाऊ नही बँकिंग सेवा देऊ शकू; शिवाय पोस्टमनमार्फतही खातेदारांना पैसे मिळतील.
१0 हजार गावांत प्रत्येक कुटुंबाला विमा
देशातील १0 हजार गावांत प्रत्येक घराला मार्च २0१९पर्यंत विमा योजनेशी जोडण्याचे लक्ष्य टपाल खात्याने ठरवले आहे. आतापर्यंत १२४४ गावांत हे काम पूर्ण झाले आहे, असे मनोज सिन्हा म्हणाले.