राहुल गांधी श्री 'राम', तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'रावण' ; अमेठीतील वादग्रस्त पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 07:50 AM2018-01-15T07:50:37+5:302018-01-15T08:01:43+5:30
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले आहे.
अमेठी - उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'श्री राम' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या स्वरुपात दाखवण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या अमेठी दौ-याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच रविवारी ( 14 जानेवारी )ही वादग्रस्त अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. गौरीगंज रेल्वे स्टेशन परिसरात हे पोस्टर लावण्यात आले आहे.
या वादग्रस्त पोस्टरमध्ये राहुल गांधी धनुष्य बाण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असल्याचं दाखवण्यात आले आहे. 'राहुल में भगवान राम का अवतार, 2019 में आएगा राहुल राज (रामराज)।',असे या पोस्टरवर लिहिण्यात आलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे वादग्रस्त पोस्टर अभय शुक्ला नावाच्या एका स्थानिकानं लावले आहे. दरम्यान, शुक्लानं काँग्रेस पार्टीसोबत कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले.
Poster seen in Amethi’s Gauriganj pic.twitter.com/mR3VnjpJeP
— ANI UP (@ANINewsUP) January 14, 2018
या वादग्रस्त पोस्टरबाजीबाबत शुक्लानं सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा परत आणणार असल्याचं आश्वासन दिले होते, मात्र असे काहीही झाले नाही. पंतप्रधान मोदींनी दिलेली सर्व वचनं खोटी निघाली. आम्हाला विश्वास आहे की 2019मध्ये राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील व सर्व आश्वासनांची पूर्तता करतील'.