नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व आजारी असलेल्या वडिलांना सायकलच्या मागे बसवून हरयाणा ते बिहारपर्यंतचा १२०० किमीचा प्रवास ज्योतीकुमारी पासवान या मुलीने केला. तिचे कौतुक नव्हे तर तिच्या गरिबीची खिल्ली उडविली जात आहे, असे सांगत नेटकऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांकावर खूप टीका केली आहे. इव्हांका हिने ज्योतीकुमारीची धाडसाबद्दल प्रशंसा केली होती.
पंधरा वर्षे वयाची असलेल्या ज्योतीकुमारीने सेकंडहँड सायलकवर मागे वडिलांना बसवून गाव गाठण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी व भारतीयांची सहनशील वृत्ती दाखविणारा आहे, असे इव्हांकाने म्हटले होते. ज्योतीकुमारी व तिचे आईवडील बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, ज्योतीकुमारी व तिच्या कुटुंबीयांची गरिबी व असहायता यांना वलय प्राप्त करून देण्याचा प्रयत्न समाजमाध्यमावर होत आहे. लॉकडाऊनमध्ये प्रवासाचे कोणतेही साधनच उपलब्ध नसल्याने त्या मुलीला हे असे धाडस करावे लागले. असे असतानाही तिने भीमपराक्रम केला असा माहोल तयार केला जात आहे. तिला सायकलवरून अशा पद्धतीने प्रवास करायला लागणे हेच सरकारचे मोठे अपयश आहे.
शिक्षण विभागाने दिली नवी कोरी सायकल
ज्योतीकुमारीला गरिबीमुळे काही वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. त्याची दखल घेत दरभंगामधील एक अधिकारी संजयकुमार देव कन्हैया यांनी सांगितले की, ज्योतीकुमारीला सिंघवारा येथील सरकारी शाळेत नववीमध्ये प्रवेश देण्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. तिला एक नवी कोरी सायकल, शाळेचा गणवेश, बूट, पाठ्यपुस्तके, वह्या आदी गोष्टी राज्य सरकारने देऊ केल्या आहेत.