प्रकाश खांडगे, भडकमकर, शानभाग यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:43 AM2018-06-20T04:43:41+5:302018-06-20T04:43:41+5:30
नवी दिल्ली: नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल संध्या पुरेचा यांचाही गौरव करण्यात येणार आहे. हिंदुस्थानी संगीतातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ललिथ जे. राव तसेच रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा बंधूंना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ३४ कलाकारांची उस्ताद ‘बिस्मिला खाँ युवा पुरस्कार २०१७’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यात प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे हिचाही समावेश आहे.
संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. मणिपूर येथे ८ जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये २०१७च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी ४२ कलाकारांची निवड करण्यात आली.
संगीत क्षेत्रातील अन्य पुरस्कार : योगेश सामसी (तबला वादन), राजेंद्र प्रसन्न (शहनाई/बासरी वादन), एम. एस. शीला (कर्नाटक संगीत), सुमा सुधींद्र (कर्नाटक संगीत-वीणा वादन), तिरुवर वैद्यनाथन (कर्नाटक संगीत-मृदंगम वादन), शशांक सुब्रह्मण्यम (कर्नाटक संगीत-बासरी वादन), मधुराणी (सुगम संगीत), हेमंती शुक्ला (सुगम संगीत), गुरुनाम सिंग (सुगम संगीत)
नृत्य क्षेत्रातील पुरस्कार : रमा वैद्यनाथन (भरतनाट्यम), शोभा कोसेर (कथक), मादांबी सुब्रह्मण्यम (कथकली), एल. एन. ओईनाम देवी (मणिपुरी), दीपिका रेड्डी (कुचिपुडी), सुजाता मोहपात्रा (ओडिशी), रामकृष्ण तालुकदार (सत्रिय), जनमेजय साई बाबू (छाहू), असीत देसाई
नाट्य क्षेत्रातील पुरस्कार : बप्पी बोस (दिग्दर्शन), हेमा सिंह (अभिनय), दीपक तिवारी (अभिनय), अनिल टिक्कू (अभिनय), नुरुद्दीन अहमद (स्टेज क्राफ्ट), अवतार साहनी (प्रकाश योजना), एस. एच. सिंह
लोककला क्षेत्रातील पुरस्कार:
अन्वर खान (मंगनियार, राजस्थान), जगन्नाथ बायान (आसामी लोकसंगीत), रामचंद्र मांझी (बिहारी लोकसंगीत), राकेश तिवारी (छत्तीसगढ, लोकनाट्य), पार्वती (बाऊल संगीत, पश्चिम बंगाल), सर्वजीत कौर (पंजाबी लोकसंगीत), मुकुंद नायक, सुदीप गुप्ता (पपेट्री, पश्चिम बंगाल)
>संगीत नाटक अकादमीचा मला प्राप्त झालेला पुरस्कार हा केवळ माझा सन्मान नसून, महाराष्ट्रातील खेडोपाडी लोकरंजनातून लोक शिक्षण देणाºया लोककलावंतांचा हा सन्मान आहे. हा पुरस्कार मी माझे गुरू डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे आणि लोककलेचे गाढे अभ्यासक अशोकजी परांजपे यांना समर्पित करीत आहे.
- प्रकाश खांडगे