संघ संस्थापक हेडगेवारांचा प्रणवदांनी केला गौरव; बघा काय म्हणाले मुखर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 05:53 PM2018-06-07T17:53:03+5:302018-06-07T17:59:21+5:30
संघाच्या कार्यक्रमाला जाण्याआधी मुखर्जींनी हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली
नागपूर: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जाण्याआधी मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याबद्दलची माहितीदेखील जाणून घेतली.
संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिल्यावर मुखर्जी यांनी त्यांच्या भावना अभ्यांगत वहीत व्यक्त केल्या. 'संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देशाचे महान सुपुत्र होते. त्यांना मी नमन करतो,' अशा भावना मुखर्जी यांनी अभ्यांगत वहीत लिहिल्या. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांच्यासोबत उपस्थित होते. संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुखर्जी यांचं स्वागत केलं. यावेळी मोहन भागवत यांनी मुखर्जी यांना महाल परिसरात असणाऱ्या हेडगेवार यांच्या निवासस्थानाचं महत्त्व सांगितलं.
प्रणव मुखर्जी थोड्याच वेळात स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसच्या मुशीत घडलेले मुखर्जी संघ स्वयंसेवकांशी नेमकं काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळासह देशाचं लक्ष लागलं आहे. प्रणव मुखर्जी यांनी संघाचं आमंत्रण स्वीकारल्यानं काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुखर्जी स्वयंसेवकाना कशाप्रकारे संबोधित करणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. काँग्रेससोबतच भाजपा नेत्यांचंही लक्ष मुखर्जी यांच्या भाषणाकडे आहे.