शरद पवार 'तसं काहीच नाही' म्हणाले; प्रशांत किशोर ३ दिवसांत दुसऱ्यांदा भेटीसाठी पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:31 AM2021-06-23T11:31:11+5:302021-06-23T11:35:39+5:30
गेल्या १५ दिवसांत पवार आणि किशोर यांची तीनदा भेट; एकदा मुंबईत, दोनदा दिल्लीत बैठका
नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांची गेल्या ३ दिवसांतील ही दुसरी भेट आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. यानंतर आज प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांच्यात परवाच एक बैठक झाली होती. गेल्या तीन दिवसांत पवार आणि किशोर यांच्यात होत असलेली ही दुसरी बैठक आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
‘राष्ट्रमंच’ केंद्र सरकारला दिशा देण्याचे काम करणार; शरद पवार यांच्या घरातील बैठकीत निर्णय
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यावर आम्हाला संख्याबळाची कल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी हा काही विषय नाही, असं शरद पवारांनी सांगितल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.
विरोधकांच्या बैठकीआधी शरद पवारांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर कालच पवार विरोधी पक्षातील नेत्यांना भेटले. या बैठकीत तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा न झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी दिली. याशिवाय राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीतही रस नसल्याचं पवारांनी सांगितलं. यानंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा पवारांच्या भेटीला गेले आहेत. गेल्या १५ दिवसांमधील ही तिसरी भेटआहे. याआधी मुंबईत ११ जूनला पवार आणि किशोर यांची बैठक झाली होती. त्यानंतर २१ जूनला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार आणि किशोर यांच्यात जवळपास साडे तीन तास चर्चा झाली.