निवडणुकीमध्ये कुठलीही तिसरी, चौथी आघाडी भाजपचा पराभव करू शकत नाही. भाजपवर मात करायची असेल, तर असा चमत्कार केवळ आणि केवळ दुसरी आघाडीच करू शकते. यामुळे भाजपच्या पराभवासाठी दुसरी आघाडी बळकट करावी लागेल, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ पीके यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024 संदर्भात भाष्य केले आहे. भाजपचा पराभव करायचा असेल, तर दुसरी आघाडी मजबूत करावी लागेल, असे ते म्हणाले.
यावेळी, आपण पश्चिम बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीला, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या आघाडीच्या रुपात उभे करण्यासाठी मदत करत आहात? असा प्रश्न विचारला असता, प्रशांत किशोर म्हणाले, "या देशात कुठलीही तिसरी अथवा चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकते, असे मला कधीही वाटले नाही. जर आपण भाजपला पहिली आघाडी मानत असू, तर तिचा पराभव करण्यासाठी दुसरी आघाडी असायला हवी. जर एखाद्या पक्षाची भजपला हरवण्याची इच्छा असेल तर, त्या पक्षाला दुसऱ्या आघाडीच्या रुपात बळकट होऊन समोर यावे लागेल. तरच हे शक्य आहे."
काँग्रेस केवळ दुसरा मोठा पक्ष -याच वेळी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले, की आपण काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही. त्यांच्या दृष्टीने काँग्रेस हा केवळ देशातील एक दुसरा मोठा पक्ष आहे.