अहमदाबाद - विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीमधील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावर क्राइम ब्रँचचे जॉईंट कमिश्नर जे.के. भट्ट त्यांच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात कारस्थान रचत आहेत, असा आरोप तोगडिया यांनी केला आहे. भट्ट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेले संभाषण उघड करण्यात यावे, अशा मागणी तोगडिया यांनी केली आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संजय जोशी यांच्याविरोधात 2005 साली उघड करण्यात आलेली सेक्स सीडी ही खोटी होत आणि ती सीडी बनवणाऱ्याचे नाव मी योग्य वेळी उघड करेन असा इशारा तोगडिया यांनी दिला आहे. तसेच राजस्थान सरकारने आपल्याविरोधात कुठलाही खटला दाखल असल्याचे वृत्त फेटाळून लावल्याचा दावाही तोगडिया यांनी केला.तोगडिया म्हणाले, 2005 साली खोटा व्हिडिओ बनवून संघासारख्या पवित्र संस्थेला बदनाम करण्याचे काम गुजरातमधून झाले होते. ती सीडी कुणी बनवली हे मला माहीत आहे. योग्य वेळी त्यांची नावे मी जाहीर करेन. क्राइम ब्रँचचे जॉईंट कमिश्नर जे.के. भट्ट हे एका कारस्थानाचा भाग बनले आहेत. त्यांनी तोगडियाच्या सन्मानाला हात घातला आहे. त्यांच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या संभाषणाची माहिती सार्वजनिक झाली पाहिजे. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया सोमनारी ‘बेपत्ता’ झाले होते. मात्र नंतर ते बेशुद्धावस्थेत एका पार्कमध्ये सापडले होते. पुढे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली. काही लोकांनी आपली मुस्कटदाबी करण्याचा व पोलीस चकमकीत आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला; परंतु कोणत्याही धमक्या व दडपणाला बळी न पडता आपण हिंदूंच्या व शेतक-यांच्या हितासाठी आवाज उठवतच राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर आपण राजस्थानच्या न्यायालयात हजर होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
प्रवीण तोगडियांचे पंतप्रधान आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप, दिल्लीमधील बॉसच्या इशाऱ्यावर रचले जातेय कारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 7:58 PM