नवी दिल्ली : पवित्र ‘पर्युषण पर्वा’च्या शनिवार आणि रविवार (२२ व २३ आॅगस्ट) या शेवटच्या दोन दिवशी तरी निदान भाविकांना प्रार्थना करता यावी यासाठी श्री पार्श्व तिलक श्वेतांबर मूर्तिपूजक जैन ट्रस्टला त्यांची मुंबईतील दादर, भायखळा व चेंबूर येथील मंदिरे (देरासर) उघडी ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. मात्र या निकालाकडे बोट दाखवून इतर कोणत्याही मंदिरांना किंवा जेथे खूप गर्दी होते अशा सार्वजनिक गणेशोत्सवांना अशी परवानगी दिली जाऊ शकणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.निदान ‘पर्युषण पर्वा’त तरी भाविकांना मर्यादित संख्येने प्रवेश देण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका ट्रस्टने उच्च न्यायालयात केली होती. परंतु ‘प्रत्येकाने व्यक्तिगत धार्मिक कर्तव्याहून अधिक व्यापक अशा सामाजिक कर्तव्याचे भान ठेवायला हवे. मनामनात परमेश्वर आहे, त्याची अशा वेळी पूजा करावी’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने ‘पर्युषण पर्व’ सुरू होण्याच्या आदल्या दिवशी परवानगी नाकारली होती. त्याविरुद्ध केलेल्या अपिलात सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे परवानगी दिली. मात्र यासाठी कोरोनाचे सर्व निर्बंध कसोशीने पाळण्याची अट घातली गेली.ट्रस्टच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले की, आम्ही काही फार मोठी गर्दी जमविण्यास परवानगी मागत नाही. दोन दिवसांत फार तर दोन-अडीचशे भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. सरकारने आता मॉल, केशकर्तनालये व मद्याची दुकानेही उघडायला परवानगी दिली आहे. तेथील गर्दीवर सरकार कसे नियंत्रण ठेवणार आहे?ट्रस्टच्या विनंतीस महाराष्ट्र सरकारच्या वतीने तीव्र विरोध करताना ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकार ती आटोक्यात ठेवण्यासाठी निकराने प्रयत्न करीत आहे व लोकही चांगले सहकार्य करीत आहेत. अशी एकाला परवानगी दिली की उद्या गणेशोत्सवालाही परवानगी मागितली जाईल. त्याने परिस्थिती आणखीनच बिकट होईल.मात्र सरन्यायाधीश न्या. बोबडे म्हणाले की, आता यांना परवानगी दिली तरी जेथे अतोनात व अनियंत्रित गर्दी होते अशा गणेशोत्सवाच्या वेळी याकडे पायंडा म्हणून बोट दाखविता येणार नाही. त्यामुळे ट्रस्ट जर एका वेळी फक्त पाच भाविकांना प्रवेश देऊ, असे म्हणत असेल तर तसे करण्यास काही हरकत आहे, असे आम्हाला वाटत नाही.सरन्यायाधीश असेही म्हणाले की, सरकारचे वागणे आम्हाला विचित्र वाटते. जेथे आर्थिक हित गुंतलेले असते तेथे ते धोका पत्करायला तयार असतात. पण धार्मिक सणांच्या वेळी मात्र ते धोक्याचा बागुलबुवा पुढे करतात.>‘परमेश्वर आम्हाला माफ करेल’सरसकट बंदी घालणे योग्य नाही, असे सांगून न्यायालयाने याआधी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून ओडिशामधील जगन्नाथ यात्रेलाही परवानगी दिली होती, याचा सरन्यायाधीशांनी संदर्भ दिला. ते म्हणाले, त्यावेळी भगवान जगन्नाथाने आम्हाला माफ केले. आता तुमचा (जैन) परमेश्वरही माफ करेल, याची खात्री आहे!
मुंबईतील तीन जैन मंदिरांत प्रार्थनेस मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 2:48 AM