खबरदारीमुळे विषबाधा टळली, नेरुळच्या रुग्णालयात तिघांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:59 AM2018-06-20T05:59:24+5:302018-06-20T05:59:24+5:30
वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा झालेल्यांपैकी तिघांवर नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा झालेल्यांपैकी तिघांवर नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात मायलेकीचा समावेश असून, मुलीला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. तिच्या वडिलांनी वेळीच उलट्या करून खालेले अन्न बाहेर काढल्याने विषबाधा टळली आहे.
महड ते मुंबईपर्यंतच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत विषबाधा झालेल्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यानुसार, नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयातही ८ ते १० जणांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करून मंगळवारी सकाळी घरी सोडण्यात आले. मात्र, तिघांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. अनीता गायकवाड (४५), निकिता गायकवाड (१७) व विलास ठिकडे (१३) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी अनीता व निकिता मायलेकी असून, विलास हा त्यांचा शेजारी आहे.
वास्तुशांतीला विलास एकटाच गेला होता. मध्यरात्री १च्या सुमारास गावातील प्रत्येक जण त्रस्त असल्याचे त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आले, यामुळे त्यांनी विलासला झोपेतून उठवून तब्बेतीची विचारपूस केली असता, त्याने पोटात दुखत असल्याचे सांगितले. यामुळे त्याला वेळीच उपचारासाठी नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले गेले.
त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या नवनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावरील संकट थोडक्यात टळले. पत्नी अनीता व मुलगी निकिता दोघींना पोटदुखीचा त्रास सुरू होताच, नवनाथनी त्यांना उलट्या करण्याचा सल्ला दिला, तसेच नवनाथ यांनीही प्रयत्नांनी उलट्या करून खालेले अन्न बाहेर काढले. यामुळे आपली विषबाधा टळल्याचे त्यांनी सांगितले; परंतु पत्नी व मुलीला स्वत:हून उटल्या करणे न जमल्याने त्यांना बाधा झाली. या वेळी नवनाथ यांनी काही सहकाºयांच्या मदतीने पत्नी व मुलीला नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचारानंतर अनीता यांची प्रकृती स्थिर झाली असून, मुलगी निकिता हिच्यावर मात्र अतिदक्षता विभागात अद्याप उपचार सुरू आहेत.
>पनवेलमध्येही उपचार :
विषबाधा झालेल्या काही रुग्णांना पनवेल, खोपोली, नवी मुंबई येथील रु ग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. पनवेलच्या प्राचीन हॉस्पिटलमध्ये अनीता राठोड यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर लक्ष्मण शिंदे, रु क्मिणी शिंदे हे शुद्धीवर आले असले, तरी त्यांना अद्याप त्रास होत आहे. खांदा वसाहतीतील अष्टविनायक रुग्णालयामध्ये सरिता माने यांच्यावर उपचार सुरू आहेत. गांधी रुग्णालयात सूरज पालांडे, संगीता पालांडे, सुनील पाटील, सारिका पाटील यांच्यावर उपचार सुरू असून, चौघांनाही आयसीयूमध्ये दाखल केले आहे.
कामोठेतील एमजीएम रुग्णालयात अर्चना कारभारे, दीक्षा प्रकाश शिंगोळे, स्वराज प्रकाश शिंगोळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. विजय श्याम शिंदे, राधा शाहुराज शिंदे, सरिता माने यांना एमजीएम रुग्णालयातून अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले असून, अलका शाहुराज शिंदे यांना घरी पाठविण्यात आले आहे. खांदा वसाहतीतील शेलार रुग्णालयात ६ जणांना दाखल करण्यात आले असून, सरिता यादव (५०), ऋ षभ यादव (१६), आशा यादव (५२), राधिका नलावडे (४७), दशरथ यादव (५५), पुंडलिक भारसकर (६५) यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरानी दिली. तर चिरायू रुग्णालयात विजय शिंदे (११) आणि राधा शिंदे (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत. पनवेल येथील स्पर्श रुग्णालयात मधुकर जानू कांबळे (५५) यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
>जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. अन्न व औषध प्रशासनाने जेवण सीलबंद करून तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.