अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 02:48 PM2019-08-16T14:48:54+5:302019-08-16T14:50:46+5:30
९ ऑगस्टपासून जेटलींवर उपचार सुरू
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी थोड्याच वेळापूर्वी माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटलींची एम्स रुग्णालयात भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि राज्यमंत्री अश्विनी चौबेदेखील रुग्णालयात उपस्थित होते. जेटलींवर ९ ऑगस्टपासून एम्सच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचं एक पथक सतत त्यांच्या सेवेत आहे. ९ ऑगस्टला एम्स रुग्णालयानं जेटलींच्या प्रकृतीची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर रुग्णालयाकडून कोणतंही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं नाही. श्वासोच्छवासात अडचणी येत असल्यानं जेटलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी जेटलींची भेट घेतली होती. या वर्षाच्या मे महिन्यातही जेटलींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. पेशानं वकील असलेल्या जेटलींनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी अर्थ आणि संरक्षण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
एप्रिल २०१८ मध्येही जेटली प्रकृतीच्या कारणामुळे त्रस्त होते. त्यांनी काही दिवस कार्यालयात जाणंदेखील बंद केलं होतं. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा जेटलींना त्रास होऊ लागला. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर पक्ष कार्यालयात मोठा जल्लोष झाला. त्यावेळीही जेटली अनुपस्थित होते.