नवी दिल्ली: देशातील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनात अनेकदा कॉल ड्रॉपचा सामना करावा लागतो. त्यामुळे कॉल ड्रॉपची समस्या सर्वसामान्य जनतेसाठी काही नवी नाही. मात्र आता पंतप्रधाननरेंद्र मोदींनादेखील या समस्येचा फटका बसला आहे. दिल्ली विमानतळाहून आपल्या सरकारी निवासस्थानी जाताना मोदींना फोनवर बोलताना कॉल ड्रॉपमुळे मनस्ताप सहन करावा लागला. यानंतर त्यांनी दूरसंचार विभागाची कानउघाडणी करत ही समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधान मोदी प्रगती उपक्रमाच्या अंतर्गत वरिष्ठ सचिवांशी दर महिन्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात. यावेळी मोदींनी दूरसंचार सचिव अरुण नटराजन यांना कॉल ड्रॉपच्या समस्येची माहिती दिली. कॉल ड्रॉप समस्या कशी सोडवली जाऊ शकते, यात लक्ष घाला. ग्राहकांना चांगली सेवा देणं ही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी जबाबदारी आहे, असं मोदींनी नटराजन यांना सांगितलं. दिल्ली विमानतळावर उतरल्यावर लोक कॉल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यावेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, असा अनुभव यावेळी मोदींनी सांगितला. कॉल ड्रॉप आता राष्ट्रीय समस्या झाली आहे, असं मोदींनी नटराजन यांना सांगितलं. कॉल ड्रॉप झाल्यावर मोबाईल कंपन्यांकडून किती दंड वसूल केला जातो, याचीही माहिती मोदींनी घेतली. यावेळी दर तीन कॉल ड्रॉपला मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांकडून एक रुपया दंड आकारला जाण्याचा कायदा प्रस्तावित आहे. मात्र हा कायदा लागू झालेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.
पंतप्रधान मोदीही कॉल ड्रॉपनं हैराण; दूरसंचार विभागाची कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:20 AM