पंतप्रधान मोदी, 'बिग बी'ला महागात पडलं 'स्वच्छता अभियान'!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:32 PM2018-07-13T18:32:25+5:302018-07-13T18:50:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 3 लाख फोलोअर्स कमी झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ तीन तासात मोदींच्या फॉलोअर्समध्ये ही लक्षणीय घट झाली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 3 लाख फोलोअर्स कमी झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ तीन तासात मोदींच्या फॉलोअर्समध्ये ही लक्षणीय घट झाली आहे. त्यानंतर 'स्वच्छ भारत अभियानां'तर्गत मोदींचे फॉलोअर्स कमी झाल्याची टीका एका ट्विटर युजरने केली आहे. @narendramodi नावाने मोदींचे ट्विटर अकाऊंट असून देशातील सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्सपैकी हे एक आहे. यापूर्वी मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 4 कोटी 33 लाख 71 हजार 783 एवढी होती. मात्र, या फॉलोअर्समध्ये घट होऊन आता ही संख्या 4 कोटी 31 लाख 81 हजार 509 एवढी झाली आहे. तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही ट्विटर फॉलोअर्सची संख्या जवळपास 4 लाखांनी कमी झाली आहे.
सोशल नेटवर्कींग साईटने 11 जुलै रोजी केलेल्या घोषणेनुसार फेक अकाऊंट कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या अकाऊंटवरुन 1 लाख 90 हजार 274 फेक फॉलोअर्स कमी झाले आहेत. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएमओ कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही जवळपास 1 लाख फॉलोअर्सची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, ट्विटरवर काही जणांनी मोदींच्या या फॉलोअर्स कमी होण्याच्या घटनेची टिंगल उडवली आहे. स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत मोदींचे फॉलोअर्स कमी झाल्याचे आकाश बॅनर्जी या नेटीझन्सने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्याही 92 हजारांनी कमी झाली आहे. तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचेही 74132 फॉलोअर्स कमी झाले आहेत. दरम्यान, तुमच्या अकाऊंटला फोलो करणाऱ्यापैकी फेक अकाऊंटची खात्री करुनच त्यांना कमी करण्यात आले आहे. त्यामुळे तुमचे अकाऊंट पारदर्शी आणि अर्थपूर्ण होईल, असे ट्विटरने म्हटले आहे.