योगेश पांडे
वर्धा : केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करून समस्त हिंदूंचा अपमान केला असून पाच हजार वर्षांच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे पाप केले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक या मुद्द्यांवरून काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही सोडले नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा येथून सोमवारी भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा शंखनाद करताना मोदी लोकसभा निवडणुकीत ‘हिंदुत्व कार्ड’ खेळले. येथील स्वावलंबी मैदानावरील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की विरोधकआता जवानांचा शौर्याचे पुरावे मागून पाकिस्तानच्या हिताची भाषा बोलत आहेत.राष्ट्रवादी-काँग्रेस कुंभकर्णासारखे आहेत. सत्तेवर असताना ते सहा महिने झोपा काढतात आणि जागे झाल्यानंतर पैसे खाऊन पुन्हा झोपी जातात. मुद्रांक, सिंचन, रिअल इस्टेट आणि सरकारी टेंडरमध्ये कोट्यावधी रुपये त्यांच्या नेत्यांनी खाल्ले, अशी टीका मोदी यांनी केली. ते म्हणाले, महात्मा गांधी, विनोबा भावे हे स्वच्छतेसाठी आग्रही होते. मात्र दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेता म्हणाला की मोदीने केवळ शौचालयांची चौकीदारी केली आहे. काँग्रेस नेत्यांच्या शिव्या हा माझ्यासाठी दागिना आहे. कारण असे कार्य करून मी कोट्यवधी माताभगिनींच्या इभ्रतीचा चौकीदार बनतो आहे.
अजित पवारांच्या हातून ‘हिट विकेट’शरद पवार हे देशातील अनुभवी नेते असून ते कुठलेही काम पूर्ण विचारांती करतात. कधीकाळी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहाणाऱ्या पवारांनी निवडणुकीतूनच माघार घेतली आहे. कारण त्यांना हवेची नेमकी दिशा कळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबीक कलह सुरू आहे. पक्ष त्यांच्या हातून निघून जात असून त्यांचे पुतणे पक्षावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अजित पवार यांनी जाहीर अपमान केला होता. मावळ येथील शेतकऱ्यांवर गोळी चालविण्याचे निर्देश पवार कुटुंबीयांनी दिले होते. शरद पवार शेतकºयांना विसरले असून पुतण्याच्या हातून ते ‘हिट विकेट’ झाले आहेत, या शब्दांत मोदींनी टीकास्त्र सोडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.वैज्ञानिकांचे केले कौतुक‘इस्त्रो’तर्फे सोमवारी ‘पीएसएलव्ही सी-४५’चे यशस्वी प्रक्षेपण करून पाच देशांचे दोन डझनाहून अधिक उपग्रह अंतराळात स्थापित करण्यात आले. याअगोदर असे प्रयोग व्हायचे तेव्हा केवळ विशिष्ट लोकांना प्रेक्षक ‘गॅलरी’त प्रवेश असायचा. मात्र देशात विज्ञानाबाबत रुची वाढावी, यासाठी यापुढे सामान्य जनतेलादेखील प्रवेश देण्यात येईल, असे सांगून पंतप्रधानांनी वैज्ञानिकांच्या कामांचे कौतुक केले.काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्होटबँक वाचविण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द उच्चारून समस्त हिंदूंचा अपमान केला. एवढेच नाही तर, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शूर जवानांना अपमानित केले.