नवी दिल्ली, दि.३ - केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आज सकाळी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि म्यानमारच्या दौर्यावर रवाना झाले आहेत. चीनमध्ये झीयामेन येथे ब्रिक्स देशांची परिषद होणार आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. भारत, चीन , ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. ब्रिक्सची ही नववी परिषद असून झियामेन येथील परिषदेचे यजमानपद चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग भूषवतील.
सत्तर दिवसांपेक्षा जास्त काळ भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलाम येथील विवादामुळे तणाव निर्माण झाला होता. एकमेकांसमोर उभे राहिलेले सैन्य दोन्ही देशांनी नुकतेच मागे घेतले, यामुळे भारताय उपखंडात निर्माण झालेला मोठा तणाव विरघळला आहे. या पार्श्वभूमिवर मोदी यांची चीन भेट महत्त्वाची ठरेल. ब्रिक्सनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमार दौृ्यावर जात असून तेथे ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. म्यानमारमध्ये ते रोहिंग्याच्या स्थलांतराचा मुद्दा प्रश्न उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. म्यानमारमध्ये सध्या वांशिक दंगली सुरु असल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. रोहिंग्यांनी बांगलादेशाच्या दिशेने पलायन सुरु केले आहे, भारतातही सुमारे ४० हजार रोहिंग्या बेकायदेशिररित्या राहात आहेत, या सर्व मुद्द्यांवर नरेंद्र मोदी चर्चा करतील अशी शक्यता आहे.