नवी दिल्ली : नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी (30 मे) दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याआधी मंगळवारी दिल्लीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर नरेंद्र मोदी यांनी प्रणव मुखर्जी यांच्यासोबत असलेल्या आपला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर जो फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये प्रणव मुखर्जी आपल्या हाताने नरेंद्र मोदी यांना काहीतरी खायला देताना दिसत आहेत. मात्र, प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदींना काय खाऊ घातले, याबाबत ट्विटरवर कोणतीही माहिती दिली नाही. फोटोमध्ये नरेंद्र मोदींच्या एका हातात टिशू पेपर आहे. तर, प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदींना मिठाई खाऊ घालून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी शुभेच्छा दिल्या असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर, नरेंद्र मोदींनी ट्विटरवर लिहिले आहे, 'प्रणव दा यांना सतत भेटल्याने चांगला अनुभव मिळतो. त्यांचे ज्ञान आणि अंतर्दृष्टी अतुलनिय आहे. ते असे मुत्सद्दी आहेत, त्यांनी आपल्या देशाला भरपूर काही दिले आहे.' यानंतर नरेंद्र मोदींनी पुढे लिहिले आहे की आजच्या भेटीत प्रणव मुखर्जी यांच्याकडून आशीर्वाद घेतला.
दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच, भाजपाचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता.