पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दहा घटनांच्यावेळेस बोलतील असे वाटले होते, मात्र....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 08:15 AM2018-05-23T08:15:00+5:302018-05-23T08:15:00+5:30

मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान लोकांशी संवाद साधत असले तरी त्यांनी काही मुद्द्यांवर बोलायला हवे होते अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती मात्र त्यांनी या मुद्द्यांवर मत मांडले नाही. यातील काही मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट बोलण्याऐवजी संदिग्ध प्रतिक्रिया दिली आणि काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

Prime Minister Narendra Modi was supposed to speak at these ten events. | पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दहा घटनांच्यावेळेस बोलतील असे वाटले होते, मात्र....

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दहा घटनांच्यावेळेस बोलतील असे वाटले होते, मात्र....

Next

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारला सत्तेत येऊन आता चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. चार वर्षात या सरकारने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असले तरी अनेक मुद्द्यांच्या बाबतीत त्यांच्यावर टीकाही केलेली असते. मन की बात या कार्यक्रमातून ते लोकांशी संवाद साधत असले तरी त्यांनी काही मुद्द्यांवर बोलायला हवे होते अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती मात्र त्यांनी या मुद्द्यांवर मत मांडले नाही. यातील काही मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट बोलण्याऐवजी संदिग्ध प्रतिक्रिया दिली आणि काही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर मौनी बाबा अशी टीका करायचे मात्र सत्तेत आल्यावर मोदी यांनी तिच भूमिका स्वीकारली.

नीरव मोदी आणि पीएनबी घोटाळा
नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये 12 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे आश्वासन देणाऱ्या आणि मी पहारेकऱ्याची भूमिका पार पाडेन असे सांगणारे मोदी या घोटाळ्यावर काहीतरी बोलतील असे वाटले होते. मात्र त्यांनी याबाबत बोलणे नाकारले. मेहुल चोकसीला मेहुल भाई म्हणून संबोधत असल्याचा त्यांचा एक जुना व्हीडिओही प्रसिद्ध झाला तसेच नीरव मोदी त्यांच्याबरोबर दावोसला गेल्याचेही  स्पष्ट झाले होते.

नोटाबंदीनंतरचे 100 बळी
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर जुन्या बंद पडलेल्या नोटा बदलण्यासाठी देशभरात रांगा लागल्या. यामध्ये गोंधळ आणि तणावाचे वातावरणही निर्माण झाले. यामध्ये 100 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र याबाबत मोदींनी भाष्य केले नाही. तसेच या नोटा बंद केल्याने नेमका किती काळा पैसा जमा झाला याची ठोस आकडेवारीही त्यांनी दिली नाही.

न्यापालिकेमध्ये हस्तक्षेप
सरकार न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अनेकवेळेस झाला. सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या रोस्टरवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले, त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाचा प्रयत्नही झाला. तसेच न्यायाधीश नियुक्त्यांमध्येही सरकार हस्तक्षेपाचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत राहिला. याबाबत पंतप्रधान काही बोलतील अशी विरोधकांना अपेक्षा होती.

अखलाक हत्याप्रकरण
2015च्या सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील दादरी येथील अखलाक नावाच्या व्यक्तीची फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याच्या आरोपावरुन जमावाने हत्या केली होती. याहत्येनंतर देशभरात असहिष्णूतेविरोधात वातावरण तयार झाले. अनेक लोकांनी आपले पुरस्कार परत केले. बिहारमध्ये नरवादा जिल्ह्यातील भाषणाक नरेंद्र मोदी केवळ इतकेच म्हणाले, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटल्याप्रमाणे विविधता आणि सहनशीलतेकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

व्यापम घोटाळा आणि गूढ मृत्यू
मध्य प्रदेश व्यावसायीक परिक्षा मंडळ (व्यापमं)द्वारे महाविद्यालय व सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश परिक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यास व्यापमं घोटाळा म्हणतात. येथे भाजपाचे सरकार असून शिवराज सिंह या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या घोटाळ्यासंबंधी 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिवराज सिंह यांचे सरकार बरखास्त करावे अशी मागणी विरोधक करत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

राफेल खरेदी वाद
एप्रिल 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौऱ्यात 36 राफेल विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. या खरेदीमध्ये खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला असा आरोप काँग्रेसने केला. अर्थात या आरोपाला फ्रान्सने फेटाळले. भारतातर्फे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी आपली बाजू स्पष्ट केली मात्र काँग्रेसला याबाबत पंतप्रधान काहीतरी बोलतील असे वाटत राहिले.

चीनबरोबर डोकलामचा प्रश्न
जून 2017मध्ये डोकलामचा वाद निर्माण झाला. डोकलाम य़ेथे भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात. चीन या परिसरामध्ये रस्ते आणि इतर प्रकारचे बांधकाम करत असल्याचे दिसून आले. यानंतर पंतप्रधान मोदी चीनलाही जाऊन आले. त्यांनी डोकलामवर आपले मत व्यक्त करावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती.

ललीत मोदीला मदत
क्रिकेट खेळात आयपीएलसारखे प्रयोग राबवणाऱ्या ललित मोदीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे भारतात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया यांनी ललित मोदीला मदत केल्याचा आरोप विरोधकांनी केला. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत बोलावे अशी मागणी विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने केली. पण पंतप्रधानांच्या ऐवजी सुषमा स्वराज यांनीच संसदेत उत्तर दिले.

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन 
नोव्हेंबर 2017मध्ये तामिळनाडूतून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नवी दिल्लीमध्ये आंदोलन केले. उंदिर खाणे, गवत खाणे, रस्त्यावर जेवणे, कवट्या गळ्यामध्ये घालणे असे आजवर न केलेले प्रकार या आंदोलनात केले गेले. तामिळनाडूच्या दुष्काळावर उपाययोजना करावी यासाठी त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन केले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.

जय शाह आणि भाजपाची संपत्ती
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा मुलग जय याच्या कंपनीला नोटाबंदीच्या एका वर्षामध्ये कोट्यवधींचा फायदा झाल्याचे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत आले. तसेच नोटाबंधीच्या काळात भाजपाच्या संपत्तीमध्ये 1,034 कोटींची वाढ  झाली तर काँग्रेसच्या संपत्तीमध्ये 225 कोटींची वाढ झाली. त्यामुळे यावर पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण पंतप्रधान याबाबत काहीच बोलले नाहीत.

Web Title: Prime Minister Narendra Modi was supposed to speak at these ten events.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.