पंतप्रधान कृषी विमा : नाव नोंदणीत ३० टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:37 AM2021-11-15T09:37:39+5:302021-11-15T09:38:19+5:30
कर्जासाठी केलेल्या अर्जांत मात्र वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान कृषी विमा योजनेच्या अंतर्गत २०१८ साली खरीप हंगामात शेतकऱ्यांची जितक्या प्रमाणात नोंदणी झाली होती, त्या तुलनेत यंदा त्याच कालावधीत या नोंदणीमध्ये ३० टक्के घट झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१८च्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान कृषी विमा योजनेसाठी २.१६ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मात्र दीड कोटी शेतकऱ्यांनीच या योजनेसाठी आपली नावे दिली आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी केलेल्या अर्जांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. मात्र नावनोेंदणीत मात्र यंदा घट आहे.
२०१९मध्ये या योजनेसाठी दोन कोटी तर २०२० साली १.६७ कोटी शेतकऱ्यांनी आपली नावे दिली होती. रब्बी हंगामात पंतप्रधान कृषी विमा योजनेसाठी २०१८ साली १.४६ कोटी, या हंगामात २०१९ व २०२० रोजी अनुक्रमे ९६.६० लाख व ९९.९५ लाख शेतकऱ्यांची नावनोंदणी झाली होती. २०१९ मध्ये कर्ज घेणाऱ्यांकडून २ ३८ कोटी व कर्ज न घेणाऱ्यांकडून १.६८ अर्ज आले. २०२० साली हेच प्रमाण अनुक्रमे २.६८ कोटी व १.४२ कोटी इतके होते. २०२१मध्ये कर्ज घेणाऱ्यांनी ३.७४ कोटी तर कर्ज न घेणाऱ्या १.२३ कोटी लोकांनी अर्ज केले होते.