नवी दिल्ली : कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी अथर्व लोहार, तर गणितातील सृजनात्मक कार्यासाठी देवेश भैय्या या महाराष्ट्रातील दोन बालकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी पथसंचलनात ते दोघे सहभागी होणार आहेत.पदक, एक लाख रुपये, व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या व सध्या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या ११ वर्षांच्या अथर्वला बाल तबलावादक म्हणून कला व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार दिला. थायलंडच्या तबलावादन स्पर्धेत अथर्वने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.गणितज्ज्ञ देवेश भैय्या या १३ वर्षांच्या बालकाने गणितात योगदान दिले आहे. देवेश जळगावमधील एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनच्या होमी भाभा ज्युनियर सायन्टिस्ट परीक्षेत आणि साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिकल आॅलिम्पियाडमधे सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी देवेशला सुवर्ण पदक मिळाले आहे. इग्नायटेड माइंडलॅब परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळविणारा देवेश हा पहिला भारतीय बनला आहे.
महाराष्ट्राच्या अथर्व आणि देवेशला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 7:17 AM