नवी दिल्ली : जगभर पसरलेल्या शिया इस्माईली समाजाचे ४९ वे धर्मगुरू प्रिन्स आगा खान भारत दौºयावर असून, धर्मगुरूपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतल्याला ६0 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.प्रिन्स आगा खान शिया समाजाच्या लोकांची भेट घेतील. हीरक महोत्सवानिमित्त डॉकयार्ड रोड येथे कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी करण्यात येत असून, डॉ. सुलतान प्रधान यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या साह्याने तीन वर्षांत ती संस्था सुरू होईल. जगभर पसरलेल्या या समाजाची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे.आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क (एकेडीएन)द्वारे ६० देशांमध्ये विधायक कामे करते. त्यात अनेक खासगी, आंतरराष्ट्रीय तसेच बिगर सांप्रदायिक संस्थांचा समावेश आहे. आरोग्य, शेती, ग्रामीण भागाचा विकास, आर्किटेक्चर आदीविविध क्षेत्रामध्ये या संस्था काम करतात. २०१५ मध्ये भारत सरकारने आगा खान यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.प्रिन्स आगाखान यांच्या हस्ते २१ फेब्रुवारीला दिल्लीत सुंदर नर्सरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सुंदर नर्सरी हा १६व्या शतकातील उद्यानांचा समूह असून, तो हुमायूनच्या कबरीला लागून आहे. या नर्सरीला युनेस्कोने जागतिक वारसा बहाल केला आहे.
प्रिन्स करिम आगा खान यांचा भारत दौरा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:39 AM