नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाच्या छपाईला सोमवारी सुरुवात करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पाच्या छपाईला हलव्याने तोंड गोड करून सुरुवात करण्यात आली. हलवा एका मोठ्या कढईत तयार करण्यात आला आणि त्याचे वाटप अर्थ मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले. यावेळी अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला आणि रस्ते व परिवहन राज्यमंत्री राधाकृष्ण आणि अर्थसचिव सुभाष गर्ग उपस्थित होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यापासून दरवर्षी अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात करताना केंद्रीय अर्थमंत्रालयातील सदस्यांचे तसेच अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे हलव्याने तोंड गोड करून छपाईची केली जाते. हलवा कार्यक्रमाला महत्त्व असून यानंतर अर्थसंकल्पाच्या नियुक्तीवर असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत त्यांच्या कुटुंबापासून वेगळे राहतात. त्यांना कोणतीही संपर्क यंत्रणा दिली जात नाही. अर्थसंकल्पाविषयी संपूर्ण गोपनीयता पाळण्यासाठी असे करण्यात येते. या कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याची सोय अर्थ मंत्रालयातच करण्यात येते.
दरम्यान, अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अरुण जेटली ताबडतोब न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. अरुण जेटली हे वैयक्तिक कामासाठी 2 आठवड्यांच्या सुट्टीवर असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अरुण जेटलींच्या कॅन्सरबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, अरुण जेटलींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिकवेळ अरुण जेटलींना अमेरिकेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाला अरुण जेटली हजर राहण्याची शक्यता कमी आहे, अशीही सुत्रांची माहिती आहे.