पाटणा : हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात कैद असलेल्या एका आरोपीने तुंरूगातच अभ्यास करून IIT ची जॉईंट एडमिशन टेस्ट फॉर मास्टर्सची (JAM) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. इतकंच नाही तर, त्याने आयआयटी रुरकीने (IIT Rurkee) घेतलेल्या या परीक्षेत संपूर्ण भारतात 54 वी रँक पटकावली आहे. सूरज कुमार उर्फ कौशलेंद्र असे परीक्षा उत्तीर्ण केलेल्या कैद्याचे नाव आहे. सुरजच्या यशामागे तुरुंग प्रशासनाचा मोठा पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे.
सूरज वारीसलीगंज पोलीस ठाणे हद्दीतील राहणारा आहे. गेल्या एक वर्षांपासून आरोपी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तुरुंगात असताना त्याने या अत्यंत कठीण परीक्षेची तयारी केली. यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला खूप मदत केली. तुरुंगात असताना त्याने या परीक्षेची तयारी करून चांगली रँक मिळवून यश संपादन केले आहे.
काय आहे हत्येचे प्रकरण ?
सूरज हत्येच्या आरोपाखाली एप्रिल 2021 पासून तुरुंगात आहे. नवादा जिल्ह्यातील वारिसलीगंज भागातील एका गावात रस्ते वादातून दोन कुटुंबात मारहाण केली झाली. एप्रिल 2021 मध्ये झालेल्या या मारहाणीत संजय यादव जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर मृत व्यक्तीच्या वडिलांनी सूरज, त्याचे वडील यांच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. 19 एप्रिल 2021 रोजी पोलिसांनी सूरजसह चार आरोपींची तुरुंगात रवानगी केली. तेव्हापासून सूरज तुरुंगात आहे.
विशेषत: सूरज गेल्या वर्षीदेखील ही परीक्षा पास झाला होता आणि त्याला ऑल इंडिया 34 वी रँक मिळाली होती. मात्र, ऐनवेळी हत्येच्या या घटनेत तो गुंतला गेला. तुरुंगात गेल्यानंतरही सूरजचा आत्मविश्वास कमी झाला नाही आणि तुरुंगात त्याने अभ्यास करून करिश्मा करून दाखवला. लागलेल्या निकालात सूरजला ऑल इंडिया 54 वी रँक मिळाली आहे.