खासगी बँकांमध्ये या वर्षी होणार मोठी कर्मचारी भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 01:55 AM2020-02-29T01:55:31+5:302020-02-29T07:02:18+5:30
प्लेसमेंट कंपन्यांद्वारे निवड; एक लाख रोजगार
नवी दिल्ली: आर्थिक मंदीचे सावट असतानाही कोटक महिंद्र, एचडीएफसी, अॅक्सिससह आरबीएल देशातील सहा बँकांमध्ये येत्या वर्षांत मोठी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. नव्या आर्थिक वर्षांत या बँकांमध्ये सुमारे १ लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, असे टीमलीज या प्लेसमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले.
अजय शहा यांनी सांगितले की, खासगी बँकांनी आता रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांना शाखा वाढविणे आणि त्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे ठरेल. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा नव्या वर्षात ३० टक्के अधिक कर्मचाºयांची भरती अपेक्षित आहे. त्यात अगदी नवे आणि काही अनुभवी लोकांना रोजगार मिळेल.
अनुभव नसलेल्यांना किमान १८ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकेल आणि अनुभवी तसेच विशेष कौशल्य असलेल्यांना एक लाख रुपयांपर्यंत दरमहा पगार मिळेल. पदवीधर, पदव्युत्तर तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी आणि अनुभव असलेल्यांना कर्मचारी भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. काही पदे उच्च श्रेणीतीलही असतील.
या बँकांत अधिक नोकऱ्या
एचडीएफसी, अॅक्सिस व कोटक महिंद्र या तीन बँकांमध्ये मिळूनच सुमारे ७५ हजार लोकांना नोकºया मिळण्याची शक्यता असून, आरबीएल बँकेत सुमारे पाच हजार कर्मचाºयांची भरती होईल, असा अंदाज आहे.
या बँकांतील भरती थेट होणार नसून, विविध प्लेसमेंट कंपन्यांमार्फत होणार आहे. त्यामुळे या भरतीची माहिती प्लेसमेंट कंपन्यांमार्फतच कळू शकेल.