लखनौ - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी गुरुवारी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत देताना वाराणसी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यावेळी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी अशी थेट लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या काल रायबरेलीच्या दौऱ्यावर होत्या. तेव्हा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. त्यावेळी मी वाराणसी येथून निवडणूक लढवू का? असा प्रतिप्रश्न प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केला. प्रियंकांच्या या प्रश्नाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. तुम्ही वाराणसी येथून लढा, त्यामुळे पूर्वांचलमध्ये पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वातावरणनिर्मिती होईल, असे सांगत कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील अन्य कुठल्याही जागेचे नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचे नाव घेतले. तसेच प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना वाराणसी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात येईल, अशा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला आहे.
वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देणार, प्रियंका गांधींनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 10:30 AM