लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आज वाराणसीत जाऊन याप्रकरणातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर प्रियंका गांधी सोनभद्रला जात असतानाच, त्यांचा वाहनताफा पोलिसांकडून अडविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले आणि चुनार गेस्ट हाऊसला नेले. याविरोधात प्रियंका गांधी यांनी आपल्या समर्थकांसह धरणे धरले आहे.
'आम्ही फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असेही सांगितले होते. तरीही प्रशासन आम्हाला त्याठिकाणी जाऊ देत नाही. आम्हाला का अडवले आहे, त्याचे त्यांनी द्यायलाच हवे.' असे यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितले. याशिवाय, मला कुठे घेऊन जात आहेत याची कल्पना नाही. पण जिथे घेऊन जातील तिथे जायला मी तयार आहे. तुम्हाला काय करायचे आहे, ते करा आता झुकणार नाही, असेही प्रियंका गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, सोनभद्र या ठिकाणी जमिनीच्या वादातून 10 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी सोनभद्रला निघाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सोनभद्र या ठिकाणी कलम 144 अर्थात जमावबंदी संदर्भातले कलमही लागू करण्यात आले आहे.