उत्तर प्रदेशात नेत्यांचे ड्रायव्हरच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष; प्रियंका करणार मोठे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:22 PM2019-06-17T17:22:13+5:302019-06-17T17:25:16+5:30
अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मोठ्या नेत्यांच्या ड्रायव्हरकडे सोपविण्यात आल्याचे वास्तव प्रियंका यांच्यासमोर आले आहे. वाराणसी विभागातील एका जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे प्रियंका यांना सांगण्यात आले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. उत्तर प्रदेशातकाँग्रेसला आपला पारंपरिक अमेठी मतदार संघ देखील वाचवता आला नाही. उत्तर प्रदेशची जबाबदारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. परंतु, त्यांना देखील उत्तर प्रदेशातील फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देखील प्रियंका गांधी अजुनही मिशन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे.
प्रियंका गांधी सध्या तरी उत्तर प्रदेशातून काढतापाय घेतील अशी शक्यता नाही. राज्यात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची प्रियंका यांनी तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये बदल करण्यापूर्वी प्रियंका गांधी जिल्ह्यांचा दौरा करत असून विविध जिल्ह्यातील सचिवांच्या बैठका घेत आहेत.
दरम्यान अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मोठ्या नेत्यांच्या ड्रायव्हरकडे सोपविण्यात आल्याचे वास्तव प्रियंका यांच्यासमोर आले आहे. वाराणसी विभागातील एका जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे प्रियंका यांना सांगण्यात आले. त्यावेळी प्रियंका यांनी गोरखपूर विभागातील एका जिल्ह्यात देखील अशीच स्थिती असल्याचे म्हटले. तर फैजाबादमध्ये एका नेत्याने आपल्या शाळेतील शिक्षकालाच जिल्हाध्यक्षपद दिले आहे. प्रियंका गांधी यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा सचिवांसोबत आयोजित बैठकीत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पक्ष संघटनेत केवळ नावापुरता बदल करायचा म्हणून पक्ष संघटन स्थानिक पातळीवर मजबूत करायचे आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रमाणिकपणे पक्षाचं काम करणाऱ्यांची नावे मागितली. अशाच लोकांना येणाऱ्या काळात पक्षाकडून चांगली जबाबदारी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.