नवी दिल्ली - सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 मध्ये बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे असं विचारलं असता हा त्यांचा दृष्टीकोन आहे असं त्यांनी सांगितलं.
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानचा दौरा करत तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. या भेटीचा संदर्भ देत प्रियंका गांधी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते' असं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राम मंदिराचं प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने आपण तिथे जाणार नसल्याचं देखील सांगितले आहे.
मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल
'पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगभर फिरतात. अनेकांच्या गळाभेटी घेतात. पण आपल्याच लोकांना भेटणे मात्र टाळतात' असा टोला प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला आहे. अमेठी आणि रायबरेली या गांधी कुटुंबीयांच्या पारंपरिक मतदारसंघांच्या दौरा केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी (29 मार्च) अयोध्येला भेट दिली. यावेळी प्रियंका गांधी यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधला. त्या म्हणल्या, 'आज या देशात जनतेचे दु:ख ऐकण्यासाठी कुणीही नाही. देशातील तरुण बेरोजगार होऊन फिरत आहेत. सध्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकार एवढे दुबळे सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही प्रियंका गांधी यांनी टीका केली. ''वाराणसीच्या गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात का असे जेव्हा मी स्थानिकांका विचारले तेव्हा त्यांनी नाही असे उत्तर दिले. हे ऐकून मला धक्का बसला. मला वाटले होते यांनी काही तरी केले असेल. पण हे पूर्ण जग फिरतात. अनेकांची गळाभेट घेतात. मात्र आपल्याच लोकांनी त्यांनी भेट घेतलेली नाही." भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार खोटारडे असल्याचा आरोपही त्यांनी केला. ''भाजपा सरकार खोटेपणा आणि प्रचारावर उभे आहे. तिथे जनतेचे दु:ख ऐकणारा कुणी नाही. देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. शेतकऱ्यांना मनरेगाचे पैसे सहा सहा महिन्यांपर्यंत मिळत नाही. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. कारण मनरेगाला बंद करण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भाजपाच्या राज्यात जनतेचा आवाज दाबला जात आहे.'' असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देणार, प्रियंका गांधींनी दिले संकेतयंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी गुरुवारी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत देताना वाराणसी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यावेळी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी अशी थेट लढाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या रायबरेलीच्या दौऱ्यावर होत्या. तेव्हा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. त्यावेळी मी वाराणसी येथून निवडणूक लढवू का? असा प्रतिप्रश्न प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केला. प्रियंकांच्या या प्रश्नाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. तुम्ही वाराणसी येथून लढा, त्यामुळे पूर्वांचलमध्ये पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वातावरणनिर्मिती होईल, असे सांगत कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती.