लखनऊ: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक झाली. यावरुन मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना काँग्रेसनं सडकून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई का होत आहे? असा सवाल काँग्रेससह विरोधकांनी उपस्थित केला आहे. नीरव मोदीला अटक झाली. हे यश आहे का? तो कुणामुळे पळून गेला होता?, असे सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उपस्थित केले आहेत. नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. नीरवला झालेली अटक म्हणजे मोदी सरकारचं मोठं यश असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. यावरुन प्रियंका गांधींनी सरकारवर तोंडसुख घेतलं. 'यात यश कसलं? त्याला भारताबाहेर कोणी जाऊ दिलं होतं?,' असे प्रश्न त्यांनी विचारले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी-वाड्रा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नीरव मोदीच्या अटकेवर भाष्य केलं. नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही, असंदेखील त्या म्हणाल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही नीरवच्या अटकेवरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'मोदी सरकारनंच नीरवला देश सोडून जाण्यात मदत केली आणि आता तेच त्याला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीसाठी या घडामोडी सुरू आहेत. निवडणूक झाल्यावर त्याला परत पाठवण्यात येईल,' असं आझाद म्हणाले. नीरवला लंडनमधील न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरवनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. नीरवला जामीन दिल्यास तो कदाचित न्यायालयाला शरण येणार नाही, असं जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्तींनी म्हटलं. पीएनबीला 13,500 कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या नीरवला भारताच्या स्वाधीन करण्यात यावं, अशी मागणी मोदी सरकारकडून ब्रिटनकडे करण्यात आली आहे.
त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 7:33 AM