अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:45 AM2019-10-09T05:45:58+5:302019-10-09T05:50:02+5:30
यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले.
नवी दिल्ली : हवामान बदलामुळे नव्हे तर अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात अनेक ठिकाणी पुराची समस्या उद्भवली आहे. आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली ही समस्या आता मोदी सरकार स्मार्ट सिटी योजनेद्वारे सोडवत आहे असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, शहरांचे अधिक उत्तम प्रकारे नियोजन व्हायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. चंदीगढ, गांधीनगर ही उत्तम नियोजनाने बांधलेली शहरे आहेत. तेथील पाणीनिचऱ्याची व्यवस्थाही चांगली आहे. त्यामुळेच पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
मात्र तसे चित्र अन्य शहरांत दिसत नाही.
यंदाच्या पावसाळ््यात देशभरात १९०० जणांचा बळी गेला तसेच ४६ जण बेपत्ता झाले. २२ राज्यांमध्ये पुराने २५ लाख लोकांना तडाखा दिला. महाराष्ट्रामध्ये ३५०, पश्चिम बंगालमध्ये २२०, बिहारमध्ये १६० जणांचा बळी गेला आहे.
जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील ल्यूटन्स भाग १३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर चंदीगढ शहराची उभारणी करण्यात आली. चंदीगढ शहर उभारताना बनविलेले नियम त्यानंतर इतर शहरांची उभारणी करतानाही अंमलात आणायला हवे होते.
मात्र तसा
निर्णय काही लोकांनी घेतला नाही. ती चूक आता मोदी सरकार सुधारत
आहे.
भाकीत ठरले खोटे, चित्रपट मात्र चालला
सागराची पातळी वाढत असल्याने २१००पर्यंत मुंबई, अंदमान-निकोबार पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे असे हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून समुद्राच्या स्थितीसंदर्भात इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेच्या अहवालात म्हटले होते. ते निष्कर्ष नाकारताना जावडेकर म्हणाले की, २०१२ साली नैैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा विनाश होणार असे भाकित अनेक लोकांनी केले होते. त्यामुळे त्यावर आधारित ‘२०१२ह्ण हा चित्रपट बनविण्यात आला होता. प्रत्यक्षात हे भाकित खोटे ठरले व २०१२ हा चित्रपट मात्र जोरात चालला. हवामान बदल हे वास्तव आहे. हे मानवनिर्मित संकट काही कथित प्रगत देशांमुळे निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले.