शीलेश शर्मा नवी दिल्ली : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा केवळ देशभरातच नव्हे, तर परदेशांतही निषेध होत असून, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या अग्रगण्य परदेशी वृत्तपत्रांनी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही या हत्येची दखल घेतली आहे. उजव्या विचारसरणीच्या विरोधात लिखाण करणा-या गौरी लंकेश यांची हत्या अशाच बातम्या या वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, दोनच दिवसांत गौरी लंकेंश यांची हत्या झाली, असाही उल्लेख सर्वांनी केला आहे.गौरी यांच्या हत्येचे पडसाद आज देशभर उमटले. सर्व राज्यांत आणि शहरांतील पत्रकार संघटनांनी या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे, मिरवणुका, मेणबत्ती मोर्चे, धरणे आदी आंदोलनांचे आयोजन केले होते. प्रेस क्लब आॅफ इंडिया आणि एडिटर्स गिल्ड यांनी हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील व लोकशाहीवरील हल्ला आहे, असे म्हटले आहे. भारतातील अमेरिकन दूतावासानेही या हत्येची निंदा केली आहे.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी येथे निषेध केला. लंकेश यांच्या हत्येमुळे समाजात असहिष्णुता आणि फाजील धर्माभिमानाच्या क्रूर चेहºयाने पुन्हा डोके वर काढल्याची भयानक जाणीव झाल्याचे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लंकेश यांच्या हत्येचा धक्का बसल्याचे व सत्य कोणीही दडपू शकत नसल्याचे म्हटले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा सत्य दडपू पाहात आहेत, परंतु ते भारतात शक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही या हत्येचा निषेध केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असून, लोकशाहीचा गळा आवळला जात आहे आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य व्हेंटिलेटरवर आहे, असे सिंघवी म्हणाले.डाव्यांची टीका-गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे मौन आश्चर्यकारक आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने म्हटले. या हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मवेड्या शक्ती आहेत, असा आरोप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी येथे केला.भाजपाची मागणी-हत्या करणाºयांना सरकारने तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीका करून, केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती वाईट झाली आहे.एम. एम. कलबुर्गी यांच्याहत्येशिवाय १८-१९ राजकीय हत्या झाल्या आहेत, असे ते म्हणाले.
गौरी यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध, पत्रकारांचे मोर्चे; परदेशी वृत्तपत्रांनीही केला उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:04 AM