लखीमपूर:लखीमपूर खीरीमध्ये शेतकरी आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या संघर्षात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, या गर्दीतील असेही काही फोटो समोर आले आहेत, ज्यावरुन हा मोठा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या आंदोलन आणि हिंसाचाराचे काही फोटोज व्हायरल होत आहेत, ज्यात काही आंदोलक जर्नेलसिंग भिंडरावालाचा फोटो असलेले टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. तसेच, त्यांच्या हातात काठ्या असून, वाहनांवर हल्ला करतानाही दिसत आहेत. भिंडरावालाचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, पण त्याचा टी-शर्ट घातलेले अनेक लोक दिसत आहेत. पोलिसही याबाबत काही सांगायला तयार नाहीत. यावरुन काहीतरी मोठं षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
मृतांमध्ये एका पत्रकाराचाही समावेश
लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या 9 लोकांमध्ये 4 शेतकरी, 4 भाजप कार्यकर्ते आणि 1 पत्रकार आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या कारने चिरडून मृत्यू झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. मंत्री आणि खासदार मिश्रा यांनी या आरोपांचे खंडन केले असून, आंदोलकांवर भाजप कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप करत आहेत.
कोण होता जर्नेलसिंग भिंडरावाला ?
जर्नेलसिंग भिंडरावाला याचे खरे नाव जर्नेलसिंग ब्रार होते. तो पंजाबमधील शीखांच्या धार्मिक गट 'दमदमी तक्षल'चा प्रमुख नेता होता. खलिस्तानची मागणी करणाऱ्या शिखांचा तो प्रमुख नेता होता. त्यानेच आनंदपूर साहिब ठरावाला पाठिंबा दिला होता. ऑगस्ट 1982 मध्ये भिंडरावाला आणि अकाली दलाने 'धर्मयुद्ध मोर्चा' सुरू केला. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता.