आंदोलक शेतकरी घरात असते तरी मेले असते!, हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:03 AM2021-02-15T06:03:11+5:302021-02-15T06:03:28+5:30
farmers Protests : या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली.
चंदीगढ : नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी त्याऐवजी घरात असते तरी मरण पावले असते. आता त्यातील काही जण स्वत:च्या हाताने मरण ओढवून घेत आहेत असे अत्यंत वादग्रस्त उद्गार हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी काढले व त्यावर ते हसलेही.
या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली. शेतकरी आंदोलनामध्ये दोनशे शेतकºयांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात भिवानी येथे एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दलाल यांनी सांगितले की, हे शेतकरी घरात असते तरी मेले असते. सहा महिन्यांत दर एक ते दोन लाख लोकांमागे दोनशे-अडीचशे लोक मरतातच. कोणी हृदयविकाराच्या झटक्याने मरतो तर कोणी आणखी काही व्याधी होऊन. मात्र शेतकरी आंदोलनातील काही लोक स्वत:च्या इच्छेनेच मरणाला कवटाळत आहेत. या वक्तव्यावर जयप्रकाश दलाल व त्यांच्यासोबतच्या लोकांमध्ये हशा पिकला. दलाल यांच्या विधानावर काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. (वृत्तसंस्था)
दलाल यांनी नंतर मागितली माफी
- या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ माजल्यानंतर हरियाणाचे कृषीमंत्री जयप्रकाश दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. ते म्हणाले की, माझे विधान विपर्यस्त पद्धतीने सर्वत्र प्रसारित केले जात आहे. मात्र माझ्या विधानांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.