पुडुचेरी : विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी २४ तास उरलेले असतानाच पुडुचेरीमध्ये सत्ताधारी काँग्रेसप्रणीत आघाडीला रविवारी धक्का बसला. काँग्रेस आणि द्रमुक या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एक आमदाराने राजीनामा दिल्याने काँग्रेस आणि द्रमुक यांचे संख्याबळ घटले आहे.
३३ सदस्यांच्या पुदुचेरी विधानसभेत काँग्रेस आणि द्रमुक यांची सत्ता आहे. मात्र, गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्याने आघाडीचे सरकार अल्पमतात आले. त्यातच मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी केलेल्या तक्रारीनंतर नायब राज्यपाल किरण बेदी यांना राष्ट्रपतींनी पदावरून दूर केले. तेलंगणच्या राज्यपाल टी. सौंदरराजन यांच्याकडे पुदुचेरीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सौंदरराजन यांनी मुख्यमंत्री नाराणस्वामी यांना सोमवार, दि. २२ फेब्रुवारीपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र, तत्पूर्वीच रविवारी काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन आणि द्रमुकचे आमदार वेंकटेशन यांनी आपापले राजीनामे राज्यपालांकडे सुपूर्द केले.