लखनौ - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील 12 जवान शहीद झाले आहेत. येथील 12 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
चंदौलीतील अवधेश कुमार यादव, अलाहाबादमधील महेश कुमार, शामलीतील प्रदीप कुमार, शामलीतील अमित कुमार,वाराणसीतील रमेश यादव, आग्रातील कौशल कुमार यादव, उन्नावमधील अजीत कुमार, कानपूरमधील श्याम बाबू, कन्नौजमधील प्रदीप सिंह, देवरियातील विजय मौर्य हे जवान पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेत.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 38 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत देश शोकसागरात बुडाला आहे. दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदनं पूर्वनियोजित कट आखून जवानांना लक्ष्य केलं आहे. परंतु अद्यापही अनेक शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अधिकृतरीत्या देशासाठी वीरमरण झालेल्यांची माहिती मिळालेली नाही.शहीद जवानांमध्ये कोणाचा तरी भाऊ, कोणाचा पती आणि कोणाच्या तरी मुलाचाही समावेश आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे.
तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला.