केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून ८२९ तरूण तरूणींची निवड करण्यात आली आहे. UPSC परीक्षेत प्रदीप सिंह यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या स्थानी जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा यांनी यश मिळविले आहे. यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेच्या मुलाखती २० जुलैला सुरु झाल्या होत्या. या परीक्षांचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे या मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
या सगळ्या गुणवंत आणि महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये लक्षवेधी ठरलेला विद्यार्थी जयंत मंकले. जयंत मंकले पुण्याचा रहिवासी आहे. दृष्टीहीन असूनही या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत १४३ वा क्रमांक पटकावला आहे. याआधीही जयंत मंकले याने लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्यावेळी जयंतचा ९३७ वा क्रमांक होता. नंतर दोन वर्ष जिद्दीने अभ्यास करून जयंतने पुन्हा परिक्षा दिली. आधीच्या परिक्षेत यश न मिळाल्यामुळे जयंतला नैराश्य आले होते. पण त्यानंतर पुन्हा परिक्षा देऊन या अंध विद्यार्थ्यानं घवघवीत यश मिळवलं आहे.
संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयातून २०१३ ला प्रथम श्रेणीतून जयंतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. याच दरम्यान जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा डोळ्यांचा आजार उद्भवला. परिणामी डोळ्यांना कमी दिसून लागले. जयंतला सुरूवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परिक्षा द्यायची होती. मात्र IES मध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. पण आपलं शिक्षण सार्थकी लागण्यासाठी ही परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत आणि परिश्रमांनंतर जयंतनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राज्यभरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर