नवी दिल्ली - देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील 125 उमेदवारांची पहिली यादी (Congress First List) जाहीर केली आहे. या यादीत 50 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, आता काँग्रेसनेपंजाबमधील 86 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सीएम चन्नी आणि सिद्धू यांच्याशिवाय प्रताप सिंग बाजवा यांना कादियान मतदारसंघातून, सुखजिंदर सिंग रंधावा यांना डेरा बाबा नानकमधून आणि हरिंदर पाल सिंग मान यांना सनोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचेही चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे, आपच्या यादीकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात सुरक्षा यंत्रणेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री चन्नी यांना टार्गेट करण्यात आलंय. त्यामुळेच, यंदाच्या पंजामधील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच, पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवर केलेल्या आंदोलनामुळेही येथील शेतकरी कोणाच्या बाजुने मत टाकणार हे पाहण्याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.