सध्या राजधानी दिल्लीमध्ये अतिक्रणांवर जबरदस्त कारवाई सुरू आहे. यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सरकारी जमिनींवर कब्जा केलेल्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे. मान यांनी सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना, कब्जा सोडण्यासाठी 31 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
मुख्यमंत्री मान यांनी, अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनी परत केल्या नाही, तर गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात पंजाबी भाषेत ट्विट करत मुख्यमंत्री मान म्हणाले, "आपण सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अवैधरित्या कब्जा केलेल्यां मंडळींना, मग ते राजकीय नेते असोत, अधिकारी असोत किंवा कुणी श्रीमंत लोक असोत. या सर्वांना विनंती करत आहोत, की त्यांनी 31 मेपर्यंत अतिक्रमण केलेल्या जमिनींवरील कब्जा सोडावा आणि जमीन सरकारला परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल."
दिल्लीत सुरू आहे कारवाई -दिल्लीत द्वारका सेक्टर 3 सह अनेक भागांत बुधवारीही अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. या भागांत अनेक बेकायदा इमारतींवर बुलडोझर चालवला जात आहे. महापालिकेने मंगळवारी न्यू फ्रेंड्स कॉलनीतील अतिक्रमण हटविले. तसेच, पालिकेचे अधिकारी सोमवारी शाहीनबाग येथेही पोहोचले होते. मात्र, येथील स्थानिक लोकांचा आणि राजकारण्यांचा तीव्र विरोध पाहता, त्यांना कारवाई न करताच परतावे लागले. याशिवाय, उत्तर दिल्ली नगरपालिकेनेही (एनडीएमसी) मंगोलपुरीच्या एका भागात मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम चालवली होती.